कोल्हापूर -कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद ( Karnatak Hijab Dispute ) अजून ताजा असतानाच आणखी एका घटनेनंतर वादाने डोकं वर काढले आहे. कर्नाटकातील हिंदू मंदिराबाहेर गैर हिंदूंनी ( Ban Non Hindu Shop In Front Of Hindu Temple ) दुकाने लावू नये, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोल्हापूरात अंबाबाई मंदिराबाहेर ( Muslim Shop In Front Of Kolhapur Ambabai Temple ) अनेक मुस्लीम तसेच इतर धर्मांचे विक्रेते आपला व्यवसाय चालवत आहेत. मात्र, इथे आजपर्यंत कधीही कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या या घटनेप्रमाणे घटना घडल्या नाहीत. शिवाय इथे सर्वच मिळून-मिसळून राहतात. त्यामुळे आजवर कधीही असे वाद घडले नाहीत आणि घडू सुद्धा देणार नसल्याचे अनेकजण म्हणाले आहेत.
अंबाबाई मंदिराबाहेर अनेक मुस्लिम व्यक्तींची दुकाने -अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. याच भाविकांवर आपला उदरनिर्वाह चालविणारे अनेक छोटे मोठे व्यावसायिक इथल्या मंदिराबाहेर आहेत. यामध्ये सर्व समाजाचे व्यावसायिक आहेत. मंदिराच्या चारही दरवाजाच्या आवारात काही मुस्लीम समाजातील बांधव सुद्धा आपला व्यवसाय चालवत आहेत. अनेकजण तर 40 वर्षांपासून आपला व्यवसाय सुरू असल्याचे म्हणतात. अंबाबाई मंदिरमधील घाटी दरवाजाच्या बाजूलाच हार, वेणी विक्रीचा व्यवसाय चालवत असलेल्या मोसीना सोंबरे यांनी सुद्धा आपल्याला या व्यवसायात आजपर्यंत कोणीही दबाव टाकला नसल्याचे म्हटले आहे. शिवाय आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने इथे व्यवसाय करतो. आमची अंबाबाई वर सुद्धा प्रचंड श्रद्धा आहे शिवाय दररोज अंबाबाईचे दर्शन घेतो, असेही त्या म्हणाल्या.