कोल्हापूर -कोरोनाचा प्रादुर्भावाची दुसरी लाट अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात जाणवत आहे. अनेक तज्ज्ञांनी तर तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. यात गाफीलपणा नको या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक घेतली. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचाही आढावा घेतला.
आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. कोडोली, आयजीएम इचलकरंजी येथील रिफलिंग आमदार निधीतून तर गडहिंग्लज आणि सीपीआरचे रिफलिंग हे डीपीडीसीतून करण्यात यावे. त्याच बरोबर जलसंपदा यांत्रिकीचे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी एकत्रित बसून ऑक्सिजन प्लाँन्टसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेला जो निधी आहे तो निधी कसा वापरायचा याचेही नियोजन करावे, अशी सूचनाही सतेज पाटील यांनी केल्या. ऑक्सिजन जनरेशन प्लाँट उभारणीच्या अनुषंगाने एमएससीबी, शेड उभारणी, जनरेटर त्याचबरोबर प्लाँट उभारणीबाबतचा विस्तृत आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला. या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.