कोल्हापूर: महाविकास आघाडीमध्ये सद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असेच गृहीत आहे. आम्हा छोट्या पक्षांना ते काय गृहीत धरत नाहीत. ते आम्हाला सोबत घेणार आहेत की नाही मला माहिती नाही. मात्र, आम्हीसुद्धा आता त्यांच्या मागे लागणार नाही. त्यामुळे येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमची ताकद नक्की दाखवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्ही या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मिळून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याबाबत तयारी करत असल्याचे म्हटले होते. त्यावर शेट्टींनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
गोकुळ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया... निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश -कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीसंदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळचे राजकारण चांगलेच तापले आहे. नेत्यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या आहेत. सत्ताधाऱ्यांवरोधात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
काय म्हटले मुश्रीफ यांनी?उच्च न्यायालयाने गोकुळ संचालक मंडळाची याचिका फेटाळून निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत आदेश दिल्यानंतर ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी सुद्धा या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र मिळून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हणत स्पष्ट असे संकेत दिले होते. असून इतर मित्र पक्ष सुद्धा ते सोबत घेणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरंतर आजपर्यंत स्थानिक पातळीवरच ही निवडणूक पार पडली आहे. मात्र, मुश्रीफ यांनी दिलेल्या या संकेतानंतर आता अनेक चर्चांना आता उधाण आले आहे. दरम्यान, शेट्टींनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया वक्त करत महाविकास आघाडी आम्हा छोट्या पक्षांना गृहीत धरत नाहीत. अजून काही माहिती नाहीये मात्र या निवडणुकीत आम्ही सुद्धा ताकद दाखवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही'