कोल्हापूर - लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले कदापि भरणार नाही, सरकारने सक्तीने वसूल केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. शिवाय, कोणतीही घोषणा करताना ऊर्जामंत्र्यांनी आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, बेजबाबदारपणे कोणतीही घोषणा करू नये, असा सल्ला सुद्धा शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये सगळे काही बंद होते. कुणाच्या हाताला कामे नव्हती. गोरगरीबांकडे पैसा नाही. ही वीजबिले भरायची कशी? सर्वसामान्य माणसाला सरकारने घरात कोंडून ठेवले होते. लोकांच्याकडे पैसे नाहीत म्हणून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले माफ करावीत, अशी आमची माफक मागणी आहे. मात्र वीजवितरण कंपनीने वसुली करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने काहीसे पॅकेज दिले, मात्र राज्य सरकारने जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही, असेही शेट्टी यांनी सांगितलं.
अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात करू
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यापुढे कोणतीही घोषणा करताना वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच जनतेला आश्वासने द्यावीत, असे सांगतानाच, सरकारने त्वरित वीज बिले माफ करावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन होत करू, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.