कोल्हापूर - महाविकास आघाडी सरकार व कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांमध्ये हिम्मत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफआरपी देऊन कारखाने चालू करून दाखवा. गाठ आमच्याशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्य शासनाने नुकतेच ऊस दराबाबत एक आदेश काढला आहे. त्यामध्ये अप्रत्यक्षपणे एफआरपीचे दोन तुकडे होणार आहेत. त्यांच्या या आदेशानंतर शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.
ऊस दर नियंत्रण समितीच्या सुत्रांमध्ये बदल करायचा असेल तर ती केवळ संसदेलाच करावी लागेल. तो अधिकार कोणत्याही राज्यांना दिलेला नाही. मात्र असे असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने यामध्ये बदल केले आहेत. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊन त्यांचा हा डाव हाणून पाडू, असेही शेट्टी म्हणाले.