महाराष्ट्र

maharashtra

...तर कायदा व सुव्यवस्थेची बुज राखणार नाही; राजू शेट्टींचा केंद्र व राज्य सरकारला इशारा

By

Published : Jul 21, 2020, 12:17 PM IST

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य व केंद्र सरकराने ठोस निर्णय घेतला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची बुज राखणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिला. उडगावच्या पुरातन रामलिंग मंदिरातील शिवलिंगाला दुग्धाभिषेक घातल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

Raju Shetti
राजू शेट्टी

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारने दूध दर आणि इतर मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढचा संग्राम मोठा असेल. यापुढे संघटना कोणता इशारा न देता थेट रस्त्यावर उतरेल. त्यावेळी कोणता सोशल डिस्टन्स पाळणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थेची बुज राखणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रती लिटरमागे पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. केंद्र सरकारने 10 हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा. दूध भुकटी निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो ३० रुपये अनुदान देऊन दूध भूकटीचा बफर स्टॉक करावा. दूध, तूप, पनीर, दही ही शेतकरी उत्पादने असल्याने त्यावरील १२ टक्के जीएसटी रद्द करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी यांनी रयत क्रांती संघटना व काल झालेल्या भाजपच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनात होती, अशी केविलवाणी धडपड भाजपाची होती. भाजपच्या आंदोलनात शेतकरी, दूध उत्पादक कुठे दिसले नाही. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनातदेखील शेतकरी दिसणार नाही, असेही शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टींचा केंद्र व राज्य सरकारला इशारा

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोकुळ दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. ही घटना जयसिंगपूर जवळील उदगाव येथील गोकुळ दूध संघाच्या विभागीय कार्यालयासमोर घडली. कोणत्याही परिस्थितीत दूध टँकर आत सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. पोलिसांनी मध्यस्ती करत, मंत्रालयातील बैठक झाल्यानंतर आपण निर्णय घ्यावा, अशी समजून काढली. त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध टँकर आतमध्ये सोडले.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उडगाव येथील पुरातन रामलिंग मंदिरातील शिवलिंगाला दुग्धाभिषेक घातला. यावेळी दूध उत्पादकाला संकटातून बाहेर काढ, राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी दे, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, अशी मागणी त्यांनी ईश्वराकडे केली असल्याचे शेट्टी यांनी माध्यमांना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details