कोल्हापूर - जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा भागांमध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक संस्थांनी पाकिस्तानचा निषेध व्यक्त करत तीव्र घोषणाबाजी केली.
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात अनेक ठिकाणी तीव्र निदर्शने - हल्ला
जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामामध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी भ्याड हल्ल्या केला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटनांनी पाकिस्तानचा निषेध व्यक्त करत तीव्र घोषणाबाजी केली.
जम्मू-काश्मीरात कायदा-सुव्यवस्थेच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या आहेत. जम्मुहून श्रीनगरकडे जाणाऱ्या सीआरपीएफच्या अडीच हजार जवानांच्या ताफ्यावर ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी महाभयंकर हल्ला केला. आयईडी स्फोटकांनी खचाखच भरलेली कार ताफ्यावर आदळून आत्मघाती स्फोट झाला. त्यात ४५ जवानांना वीरमरण आले. अनेक जवान जखमी झाले आहेत. आजपर्यंतचा देशावरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. दरम्यान, या महाभयंकर हल्ल्यानंतर अवघ्या देशात संतापाचा वणवा पेटला आहे. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, दहशतवाद्यांना चिरडून टाका, अशी मागणी देशभरासह कोल्हापुरातही होत आहे.
शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, शिवाजी पुतळा या ठिकाणी अनेक पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांचे लोक एकत्र आले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. शिवाय शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक तिरडीही जाळण्यात आली. केंद्र सरकारने निवडणुकांपूर्वी देशाच्या एका जवानाच्या बदल्यात पाकिस्तानच्या १० दहशतवाद्यांचा खात्मा करू, असे म्हटले होते. आता ४५ जवानांना वीरमरण आले आहेत. आता ४०० आतंकवाद्यांचा खात्मा करा, अशा तीव्र शब्दात प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय कोणत्याही पद्धतीच्या घोषणा न करता, जशाच तसे उत्तर देण्याची गरज असल्याची भावना सर्वत्र उमटत आहे.