कोल्हापूर - कोरोना पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने मिळत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही. उलट बेजबाबदारपणा व सुरक्षा व्यवस्थेविषयी जनतेच्या मनात चिंता आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या आरोग्याची सतर्कता, तसेच योग्य त्या आरोग्य सुविधा तत्काळ दिल्या नाही तर प्रहार संघटना जनतेसोबत आंदोलनात्मक लढा देईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयराज कोळी यांनी दिला.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह कोल्हापूर सीपीआरमधील जबाबदार अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष कोळी यांनी हा इशारा दिला, कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांच्यासह प्रहारचे कोल्हापूर शहराध्यक्ष समीर यवलूजे ,जिल्हासंघटक अक्षय जाधव ,आशिष शिंदे ,अनिस मुजावर, नितीन गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यापासून कोल्हापूरमध्ये कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने उपाययोजना राबवत आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्यानंतर कोल्हापूर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून आला. यामध्ये अपुऱ्या बेड अभावी दोन दिवसांमध्ये तीन रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या जवळपास दोन डझनभर आजी माजी आमदार खासदार लोक नेते आहेत. मात्र, रुग्णालयातील सुविधांबाबत कोणालाच याचं गांभीर्य नाही का? कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्री असून बेड शिल्लक नाही म्हणून सर्वसामान्य माणसाचे जीव हॉस्पिटलच्या दारात जातो, हे फार मोठं दुर्दैव आहे.