कोल्हापूर-तहसील कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसिलदार सचिन गिरी, शीतल मुळे-भामरे यांची बोगस सही करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. जमिन बिगरशेती केल्याचा बोगस आदेश देणाऱ्या करवीर तालुक्यातील कणेरी गावातील आरोपी गजानन रवींद्र पाटील याला गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे.
गोकुळ शिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेर्ली येथील बेबीताई श्रीकांत मांडरेकर यांच्या मालकीची नेर्ली येथील जमीन बिगरशेती करण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानुसार संशयित आरोपी याने आपण जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करत असल्याची बतावणी करून मांडरेकर यांचे एकाच गटाचे करवीर तहसील कार्यालयाचे दोन बिगरशेती आदेश तयार केले होते. त्यावर तहसील कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसीलदार सचिन गिरी व शीतल मुळे-भामरे यांची बोगस सही करून दिली. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी गजानन पाटील याने भू-धारकांना बनावट बिगरशेतीचे आदेश दिल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी पाटील यांच्या कणेरी येथील राहत्या घरातील संगणक, प्रिंटर-स्कॅनर, कॉपी, पेनड्राईव्ह, शिक्के तयार करण्याचे मशीन, असा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.