महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला अंधश्रद्धेचे गालबोट ; सामना जिंकण्यासाठी खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घालून मैदानात !

गेले काही दिवस झाले शाहू स्टेडियमवर एक फुटबॉल चषक सुरू आहे. यामध्ये कोल्हापुरच्या पेठा-पेठांमधील संघ सहभागी होत असतात.

By

Published : Feb 9, 2019, 1:21 PM IST

जिंकण्यासाठी खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घालून मैदानात

कोल्हापूर - फुटबॉल प्रेमींची नगरी म्हणून संपूर्ण राज्यात कोल्हापूरची ओळख आहे. येथील खेळाडूंनी जिद्द आणि मेहनतीने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवल्याचा इतिहास आहे. मात्र, कोल्हापूरच्या या क्रीडा परंपरेला आता अंधश्रद्धेने गालबोट लागले आहे. कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर फुटबॉलचा सामना सुरू असताना एका परदेशी खेळाडूने चक्क सॉक्समध्ये लिंबू घालून खेळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गेले काही दिवस झाले शाहू स्टेडियमवर एक फुटबॉल चषक सुरू आहे. यामध्ये कोल्हापुरच्या पेठा-पेठांमधील संघ सहभागी होत असतात. यादरम्यान झालेल्या एका सामन्यात सॅनो पॅटस हा परदेशी खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घालून खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खेळाडू कोल्हापुरातील स्थानिक संघाकडून खेळत होता. सुरुवातीला हा नेमका काय प्रकार आहे हे कोणालाच समजले नाही. मात्र, त्याच्या सॉक्समध्ये लिंबू असल्याचे मैदानावरील प्रेक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पंचांना विचारणा केली.

जिंकण्यासाठी खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घालून मैदानात

हा संपूर्ण प्रकार कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला गालबोट लावणारा असल्याने तत्काळ त्या परदेशी खेळाडूला पंच सुनील पवार यांनी पिवळे कार्ड दाखवून बाहेर काढले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मैदानावर लिंबू घेऊन आलेला संघ जिंकत असल्याची अंधश्रद्धा येथे रूढ झाली असून लिंबू प्रकार आज हा केवळ कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजत आहे.

क्रीडासह कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवण्यासाठी मेहनत आणि उत्तम आरोग्याची गरज असते. यासाठी कोणतेही लिंबू कामी येत नाही, हे अशा महाभाग खेळाडूंच्या संघाला कोण सांगणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकाराबाबत संपूर्ण क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details