कोल्हापूर :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे 28 जून रोजी शासन आपल्यादारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे फोटो आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे फोटो नसल्याने या जाहिरातीवरून सोशल मीडियावर आज दिवसभर राजकीय चर्चेला उधाण आले. या जाहिरातीवर महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, ठाकरे गट शिवसेनेचा उल्लेख नसल्याने ही जाहिरात आता वादात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नेमके काय? आहे, याबाबत जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादी भाजप जवळीक :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात फेरबदल केला. त्यानंतर कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षांतर्गत झालेल्या या प्रकारानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार काहीसे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाल्या. अजित पवारांनी तर विरोधीपक्ष नेते पदातून मुक्त करा अशी, जाहीर मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते पद असतानाही पवारांनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पवार भाजपशी जवळीक साधत आहेत का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.