कोल्हापूर - कोल्हापुरसह संपूर्ण जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली असून नदीची सद्याची पाणीपातळी 29.5 फुटांवर पोहोचली आहे. शिवाय जिल्ह्यातील 31 बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. आज आणि उद्या हवामान खात्याने सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दोन दिवस जिल्ह्यात रेड अलर्ट -
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) दोन दिवस यापेक्षाही जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्याची पाणीपातळी जवळपास 30 फुटांपर्यंत पोहोचली असून एकूण 39 फूट ही इशारा पातळी आहे. तर 43 फूट इतकी धोका पातळी आहे. त्यामुळे सातत्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह, घाटमाथ्यावर धुवांधार पाऊस सुरू आहे. विशेष करून राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा, आजरा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर उद्यापर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडेल असा इशाराही देण्यात आला आहे.