कोल्हापूर - गेल्या 24 तासापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने गुरुवारी मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका अगदी गडद झाला आहे. त्यामुळे प्रयाग चिखली गावात एनडीआरएफकडून रात्रभर मदत कार्य सुरू आहे.
प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरात देखील शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर, सुतार मळा आदीभागात पाणी साचायला सुरवात झाली आहे.
हेही वाचा-वाईतील देवरुखकर वाडी वस्तीवर कोसळली दरड ; पाच जण अडकले
२०१९ साली आलेल्या महापुराच्या अनुभवावरून येणार धोका लक्षात घेत एनडीआरएफचे दोन पथक कोल्हापूरात दाखल झाले आहे. सायंकाळी (22 जुलै) चार वाजल्यापासून एक पथक प्रयाग चिखली येथे तैनात केले आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, यासाठी घरोघर फिरून बाहेर पडण्याचे आवाहन एनडीआरएफच्या जवानांनी केले. नागरिकांनी सहकार्य करत जनावरांसह कौटुंबिक साहित्य घेत बाहेर पडले. पावसाचा जोर सुरू राहिल्याने चिखली गावात पाणी वाढायला सुरवात झाल्यानंतर एनडीआरएफने रात्रभर गाव खाली करण्याचे काम हाती घेतले आहे. मध्यरात्रीपर्यंत ५० टक्के गाव खाली करण्यात एनडीआरएफ जवानांना यश आले.