कोल्हापूर -घराच्या गच्चीवरील मोकळ्या जागेत शेती करण्याचा अभिनव प्रयोग कसबा बावडा येथे करण्यात आला आहे. येथील सुधाकर पाटील यांचा बँकिंग क्षेत्रातील सेवा पुरविण्याचा मूळचा व्यवसाय. या व्यवसायाबरोबरच त्यांना शेतीची सुद्धा प्रचंड आवड आहे. त्यामुळे ते नेहमी नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करत असतात. यातूनच त्यांनी गच्चीवर उत्तम भातशेती केली आहे.
मूळचे गडहिंग्लजचे असलेल्या सुधाकर पाटील यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी कसबा बावडा येथे दोन ते अडीच हजार स्क्वेअर फुटांमध्ये घर बांधले. घराची रचना करताना त्यांनी जास्तीत जास्त गॅलरी आणि गच्चीवरील जागा फळ भाज्यांच्या लागवडीसाठी कशी उपयोगात आणता येईल याचा विचार केला. आजपर्यंत त्यांनी आपल्या गच्चीवर अनेक मसाले पदार्थ आणि फळ भाज्यांचे उत्पादन घेतले आहे. आता तर त्यांनी गच्चीवर भाताची शेती केली आहे. लॉकडाऊनमध्ये घरी बसून काय करायचे? हा विचार करत असतानाच त्यांना या भात शेतीची कल्पना सूचली. याद्वारे पुढचे 6 महिने सर्व कुटुंबाला पुरेल इतका तांदूळ मिळेल असाही त्यांना विश्वास आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : कोतोलीमधील बँक ऑफ इंडियाने घातला मंडप, नागरिकांची गैरसोय झाली दूर