कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्याईमुळे जिल्ह्याला सदन जिल्हा म्हणून वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. मात्र, आजही या जिल्ह्यात शेतकरी अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यापैकीच एक असलेले कृष्णा आनंदा खोत या शेतकऱ्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला. ते कशाप्रकारे शेती करतात. शेतीतून मिळणाऱ्या उत्त्पन्नावरून कशाप्रकारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...
कोल्हापुरावर निसर्गाची कृपादृष्टी; मात्र, अल्पभूधारक शेतकरी अजूनही कर्जाच्याच फेऱ्यात, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी इथं क्लिक करा...
कोल्हापूर जिल्हा गंभीर दुष्काळाच्या कोसो दूर आहे. या जिल्ह्यावर वरूणराजाची नेहमीच कृपादृष्टी असते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीवर आपली प्रगती साधली आहे. काही शेतकरी आजही फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करत आहेत. त्यापैकीच एक कृष्णात आनंदा खोत हे शेतकरी आहेत. खोत यांच्याकडे २ एकर शेती आहे. त्यांची पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. मुलीने नुकतेच बी.एस.सी.चे शिक्षण पूर्ण केले आहे. एक मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे, तर एक मलगा आता बारावीत शिक्षण घेत आहे. त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च आजपर्यंत दुग्धव्यवसायवर केला. मात्र, आता त्यांच्यासमोर मुलीच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे.
खोत यांच्या सर्व भावांमध्ये मिळून एक विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यावर बहुतांश शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, काही ठिकाणी त्यांनी १० हजार फूट पाईपलाईन टाकून नदीवरून शेतीसाठी पाणी आणले आहे. त्यासाठी सुद्धा त्यांचा लाखो रुपये खर्च झाला आहे. मात्र, त्याप्रमाणे पीक येईल याची शाश्वती नसते.
पावसाच्या अंदाजावरच शेती -
खोत हवामान खात्याच्या अंदाजावरच आपल्या शेतात कोणते पीक घ्यायचे? हे ठरवतात. शेतामध्ये प्रामुख्याने ते ऊसाची शेती करतात. पावसाच्या अंदाजावर ते भुईमूग, भात, सोयाबीन आदी पीके घेत असतात. हवामान खात्याने चांगला पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे त्यांनी उसाचे पीक घेतले आहे.
दुग्धव्यवसायवरच उदरनिर्वाह -
खोत यांच्याकडे एक गाय, एक म्हैस, दोन वासरे आणि एक बैल असे ५ जनावरे आहेत. त्यामध्ये गायी आणि म्हशीपासून सध्या त्यांना दिवसाला ५-६ लिटर दूध मिळते. दुध विकून मिळालेल्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जनावरांचे दूध बंद होते. तेव्हा मात्र त्यांच्यासमोर उदरनिर्वाह कसा चालवावा? हा प्रश्न निर्माण होतो.
सोसायटीच्या कर्जाच्या फेऱ्यात -
प्रत्येक वर्षी खोत आपल्या २ एकर जमिनीवर एकरी ४० हजार रुपयांप्रमाणे ८० हजार रुपयांचे कर्ज घेतात. प्रत्येक वर्षी शेतीसाठी बियाणे, औषध, खते आणि इतर खर्चासाठी कर्ज घ्यायचे अन् शेतीच्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशाने कर्जाची परतफेड करायची, असे चक्र सुरूच असते. मात्र, कधी म्हणावे तसे पीक मिळत नाही. केलेल्या खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळते. अशावेळी कर्ज परतफेड करायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडतो. पुन्हा कुणाकडून तरी कर्ज घेऊन सोसायटीचे कर्ज ते भरत असतात.