कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापूरमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यामध्ये प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह मेघा पानसरे, उमा पानसरे, मुक्ता दाभोळकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ विचारवंत सहभागी झाले.
पानसरेंच्या हत्येला ४ वर्षे पूर्ण; कोल्हापुरात निघाला 'निर्भय मॉर्निंग वॉक' - Nirbhay morning walk
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापूरमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला.
कोल्हापूरमध्ये आज संध्याकाळी स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी जब्बार पटेल मार्गदर्शन करणार आहेत. चळवळीतील कार्यकर्ते आज बिंदू चौकात धरणे आंदोलनही करणार आहेत. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात येणार आहे. ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने तपास करून खरे मारेकरी समोर आणले. त्याचप्रकारे महाराष्ट्र एसआयटीनेही तपास करून दाभोळकर आणि पानसरे यांच्या मारेकऱ्यांना समोर आणण्याची गरज असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी म्हटले आहे. तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. पण यामध्ये सुधारणा होण्याची गरज असून देशातील ४ विवेकवाद्यांची हत्या झाली आहे. त्यांना न्याय मिळावा, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून ४ जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींची एसआयटीकडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे या ४ जणांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, खून करणे या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भक्कम पुराव्यांसह ८५ साक्षीदारांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे.