कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महापुराची परिस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने जिल्ह्यात पाचारण करण्यात आलेल्या एनडीआरएफ टीम सज्ज झाल्या आहेत. आज एनडीआरएफच्या एका पथकाने शिवाजी पूल येथे येऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे टीम कमांडर नितेश कुमार यांनी सांगितले.
कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; एनडीआरएफच्या पथकांनी केली पूरबाधित भागाची पाहणी - कोल्हापूर पूर एनडीआरएफ पाहणी
कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने जिल्ह्यात पाचारण करण्यात आलेल्या एनडीआरएफ टीम सज्ज झाल्या आहेत. आज एनडीआरएफच्या एका पथकाने शिवाजी पूल येथे येऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.
गेल्या वर्षी आलेल्या महापुरात एनडीआरएफच्या पथकाची कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मोठी झाली होती. त्यामुळे यंदा जिल्हा प्रशासनाने अगोदरच दोन एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने खबरदारी म्हणून आणखीन दोन एनडीआरएफच्या पथकांना बोलावण्यात आले आहे. सध्या कोल्हापुरातील आंबेवाडी, चिखली गावातील पूर परिस्थितीवर एक पथक लक्ष ठेवून आहे, तर दुसरे पथक शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे लक्ष ठेवून आहे. गरज भासल्यास उर्वरित दोन पथकांना पूरबाधित क्षेत्रात तैनात करण्यात येणार असल्याचे नितेश कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या 48 तासांमध्ये धरणातील पाणी नदीमध्ये न सोडता ही पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल वीस फुटांली वाढली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर शहरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. आंबेवाडी, चिखली गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.