कोल्हापूर -अचानक पाणी पातळी वाढल्याने पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे गावातील नदीकाठी असलेल्या एका झाडावर तब्बल 3 दिवस माकडांचा कळप अडकला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानांनी त्यांना बोटच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही केला. मात्र, माकडांच्या जवळ जाताच माकडे आक्रमक व्हायला लागली. शेवटी आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानांनीच एक शक्कल लढवली आणि माकडांना बाहेर काढण्यासाठी मार्ग केला.
पुरामुळे झाडावर अडकली माकडे हेही वाचा -VIDEO: अन् 'त्या' मद्यधुंद चालकाने पुराच्या पाण्यात घातली गाडी, पाहा... पुढे काय घडलं
21 जुलैपासून माकडे नदी काठच्या झाडाच्या शेंड्यावर
पन्हाळा तालुक्यातल्या वाघवे गावात नदीकाठी असलेल्या झाडावर 20 ते 25 माकडांचा कळप अडकला होता. झाडाच्या सभोवताली पाणी आल्याने आणि आजूबाजूला इतर झाडे सुद्धा नसल्याने त्यांना बाहेर येता येत नव्हते. याबाबत गावातीलच दिपक पाटील या तरुणाने 21 जुलै रोजी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला आणि या संपूर्ण प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली. जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाण्याची पातळी सुद्धा सातत्याने वाढत चालली होती. जिल्ह्यात नागरिकांचे रेस्क्यूचे काम सुरू होते, त्यामुळे सर्वजण त्यामध्ये व्यस्त होते. आंबेवाडी आणि चिखली गावातील रेस्क्यूचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच एक बोट वाघवे गावात नेण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सूचना केल्या. त्यानुसार माकडांना वाचविण्यासाठी रविवारी एक पथक गावात आले. आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत वन विभागाचे काही कर्मचारी सुद्धा हजर झाले. या सर्वांनी गावातील तरुणांच्या मदतीने नदीचे पाणी जिथपर्यंत आले होते तिथपर्यंत बोट नेली आणि बाचावकार्य सुरू केले.
अशी लढवली शक्कल
माकडे 21 जुलैपासून झाडावर अडकून होती. त्यामुळे, त्यांना वाचविण्यासाठी पथक रविवारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर बाचावकार्य सुरू केले, मात्र माकडे जास्तच आक्रमक होऊ लागली. काही माकडे तर अंगावर येऊ लागली. एक दोन माकडे असती तर काढणे शक्य होते, मात्र जवळपास 25 माकडे झाडावर अडकून होती. त्यात 4 दिवसांपासून उपाशी. त्यामुळे, यांना कसे बाहेर काढायचे, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. सर्वात आधी सर्व माकडांसाठी झाडावर काही केळीने भरलेल्या टोपली बांधून ठेवल्या. भुकेल्या माकडांनी क्षणार्धात त्याचा फडशा पाडला. मात्र, अजून चारही बाजूंनी पाणी असल्याने त्यांना काढणे आवश्यक होते. शेवटी पथकातीलच एका जवानाने शक्कल लढवून माकडे ज्या झाडावर अडकली होती, त्या झाडावरून दुसऱ्या झाडाला दोर बांधले. असे जवळपास 200 मीटरवर असलेल्या सर्व झाडांवर दोर बांधून माकडे स्वतःहून बाहेर पडावीत यासाठी मार्ग केले. विशेष म्हणजे, त्यातली काही माकडे आज बाहेरही पडली आहेत. दरम्यान, हे आव्हानात्मक रेस्क्यूचे काम कॅमेरामध्ये कैद केले असून या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे अनेक गावांत नागरिक पुराच्या पाण्यामुळे अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू असतानाच इकडे मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा या जवानांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा -कोल्हापुरातील वासणोली लघु प्रकल्पाला भगदाड, परिसरातील गावांना धोका