कोल्हापूरRaju Shetty agitation Continue:जिल्ह्यातील कोणत्याच साखर कारखान्याला स्वाभिमानीच्या मागणीनुसार दर देणं परवडणारं नाही. जिल्ह्या लगतच्या कर्नाटकात साखर कारखाने सुरू झाले असून आता यावर विचार करण्याची गरज आहे, अशी माहिती (Kolhapur Collectorate meeting) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यंदाची ऊसाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी, मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागण्यांसाठी जिल्हाभर आंदोलनं सुरू आहेत. गळीत हंगाम लांबत असल्यानं यावर तोडगा निघणं गरजेचं असल्यानं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांचे प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती.
स्वाभिमानीची मागणी अन्यायकारक :स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेली मागणी ही साखर कारखानदारांवर अन्याय करणारी आहे. शेजारील कर्नाटकात साखर कारखान्यांनी दोन लाखांचे मॅट्रिक टनाचे गाळप केले. आता जिल्ह्यातील ऊस कर्नाटकात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून आंदोलनात तोडगा निघण्याची अपेक्षा होती; मात्र ही बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी अंतिम तोडगा म्हणून त्यांना शंभर रुपये शेतकऱ्यांना जादा देण्याची तयारी दर्शवली. परंतु, स्वाभिमानीच्या नेत्यांसह शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना हा तोडगाही मान्य झाला नाही. त्यामुळे त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. रविवारी जिल्हाभर होणारं चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. यामुळे आता ऊस तर आंदोलनामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे.