कोल्हापूर - यंदा जुलै ते ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने त्याचा धोका आजूबाजूच्या गावांना आहे. असाच धोका पन्हाळा शाहूवाडीतील अनेक वाडीवस्त्यांना झाला आहे. पन्हाळगड ते विशाळगड या ऐतिहासिक मार्गावर असणारा मसाई पठाराला धोका निर्माण झाला आहे. तब्बल 20 पेक्षा अधिक किलोमीटर क्षेत्रात पसरलेले पठार ठिकठिकाणी खचले आहे. पठाराच्या पायथ्याशी असणाऱ्या 15 ते 20 गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या नागरिकांना आपले मरण डोक्यावर आले असल्याचा अनुभव येत आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी गावकरी करत आहे.
पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांना 'मसाई पठार' भूस्खलनाची भीती ऐतिहासिक पन्हाळगड-विशाळगड मार्गावर धोका छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात पन्हाळागड व विशालगड मार्गाचे अधिक महत्व आहे. पन्हाळगडपासून १५ ते २० किलोमीटर असा विस्तीर्ण मसाई पठार पसरलेला आहे. त्याच्या पायथ्याला जवळपास 20 गावे वसली आहेत. मात्र जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मसाई पठारावरील काही भाग अनेक ठिकाणी खचला आहे. वरेवाडी, कुंभारवाडी, खोतवाडी, म्हाडलाईवाडी या ठिकाणी संपूर्ण डोंगर खचून खाली आला आहे. जवळपास पंधरा ठिकाणी पठारा खालील भाग खचला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर या भागात अधिक आहे. रायगड व सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे हे संपूर्ण दृश्य आठवले, की आमच्या डोक्यावर देखील मरण उभे आहे, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्येक रात्र मरणाच्या भीतीने जागून काढतो, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
'शासनाने संरक्षण भिंती सारख्या उपाययोजना करावी'
मसाई पठारावर अनेक ठिकाणी डोंगर खचला आहे. डोंगरांची संपूर्ण माती शेतात आली आहे. पावसाचे पाणी डोंगरावरील माती घेऊन गावांमध्ये आले आहे. पावसाचा जोर सतत वाढत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी घटना घडू शकते. शिवाय वनविभागाच्या परवानगी नसल्याने रखडलेल्या रस्त्यामुळे मदतकार्य देखील वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे शासनाने संबंधित गावांमध्ये संरक्षण भिंत सारख्या उपायोजना करावे. शिवाय भविष्यातील दुर्घटना टाळता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली आहे. परंतु यावर ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. तर उपयोजना लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -भाज्यांचे भाव झाले दुप्पट ते तिप्पट, पहा काय आहेत भाव