कोल्हापूर - कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकपदी सुहास वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विश्वास नांगरे-पाटील यांची बदली नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. सुहास वारके यांनी आजपासून कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. कोल्हापूर परिक्षेत्रात कडक शासन आणि गुन्हेगारांवर वचक हे माझे पहिले कर्तव्य असल्याचे वारके यांनी सांगितले.
विश्वास नांगरे-पाटील यांची बदली; सुहास वारके कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे महानिरीक्षक - vishwas nagre patil
राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात विश्वास नांगरे-पाटील आणि सुहास वारके यांचा समावेश आहे.
राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात विश्वास नांगरे-पाटील आणि सुहास वारके यांचा समावेश आहे. नवे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके हे मूळचे जळगावचे आहेत. ते २००० मध्ये ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सोलापूरचे पोलीस उपायुक्त, बीडचे पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध, राज्य गुन्हे अन्वेषण, राष्ट्रीय तपास यंत्रणेमध्ये (एनआयए) अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
सध्या ते दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून मुंबईत कार्यरत होते. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर ते कोल्हापूरला प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून अल्पकाळ कार्यरत होते. कडक शिस्त, प्रशासनावर पकड, समाजकंटकांवर वचक ठेवण्यात त्यांचा हातखंडा, असा त्यांचा लौकिक आहे. पोलीस कल्याण कार्यक्रमांतर्गत पोलीस आणि कुटुंबीयांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात नेहमीच त्यांची सकारात्मक भूमिका राहिली आहे.
नांगरे-पाटील यांनी १२ जुलै २०१६ रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार कार्यभार स्वीकारला होता. २ वर्षांच्या कामगिरीनंतर पोलीस महासंचालकांनी त्यांना मुदतवाढ दिली होती. कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाची पावले उचलली होती. आज विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राची महानिरीक्षक पदाची सर्व सूत्रे सुहास वारके यांच्याकडे सुपूर्द करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांनीही एकमेकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना सुहास वारके म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासह ५ जिल्ह्यात विश्वास नांगरे-पाटील यांनी जे पायंडे पाडले आहेत ते पुढेही सुरू ठेवले जातील तसेच परिक्षेत्रात कडक शासन आणि गुन्हेगारांवर वचक हे माझे प्रथम कर्तव्य असल्याचे सुहास वारके यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.