कोल्हापूर - पोलीस लाईनमधील अतिक्रमण काढल्याने पोलीस निरीक्षकाचे घर रॉकेल टाकून पेटवल्याची घटना घडली. कोल्हापूरमधील भुदरगड येथे पोलीस निरीक्षक असलेल्या संजय पतंगे यांची घरी हा प्रकार झाला. यामध्ये पतंगे यांच्या घराचा काही भाग पेटला असून त्यांची खासगी चारचाकी गाडीसुद्धा यामध्ये जळून खाक झाली. याय प्रकरणात सुभाष देसाई या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे.
भुदरगड पोलीस लाईन परिसरात सुभाष देसाई याने अतिक्रमण करून दुकानासाठी गाळा काढला होता. या अतिक्रमणावर पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी कारवाई करून ते काढले होते. त्याचा राग धरून सुभाष देसाई याने वसाहतीतील कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. मंगळवारी रात्री उशिरा त्याने पोलीस निरीक्षक पतंगे यांच्या मोटारीवर आणि घरावर रॉकेल टाकून पेटवून दिले. आगीमुळे घराच्या काचा फुटल्या असून आतील फर्निचरलाही आग लागून मोठे नुकसान झाले.