कोल्हापूर जिल्ह्यातील संपर्कप्रमुख (ठाकरे गट) अरुण दुधवडकर कोल्हापूर Aaditya Thackeray in Kolhapur : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे नेते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. जागा वाटपांमध्ये जागा कुणालाही मिळाली तरी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याला सुरूवात केलीय. याच पार्श्वभूमीवर ते आजपासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघात दोन तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक अशा तीन सभा होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील संपर्कप्रमुख (ठाकरे गट) अरुण दुधवडकर यांनी दिली.
असं राहणार नियोजन :आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देत अरुण दुधवडकर म्हणाले की, सभेची तयारी आणि कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी शिवसैनिकांना वाटून देण्यात आलीय. आदित्य ठाकरे दुपारी 3 वाजता कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास आदमापूर येथील श्रीक्षेत्र बाळूमामाचे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता त्यांची गारगोटी येथील हुतात्मा चौकात सभा पार पडणार आहे. तर संध्याकाळी 7:30 वाजता कोल्हापूर शहरात मिरजकर तिकटी येथे त्यांची दुसरी सभा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुपारी 12 वाजता हुपरी येथील यशवंत मंगल कार्यालय येथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
आदित्य ठाकरेंच्या सभेला मुरलीधर जाधव हजेरी लावणार? :काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तर माजी आमदार सुजित मिणचेकर, उपनेत्या सुषमा अंधारे आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कट रचून उद्धव ठाकरेंचे कान भरून कारवाई करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे या मतदारसंघात येत असल्यानं त्यांच्या सभेला मुरलीधर जाधव येणार का? तसंच यावेळी आदित्यठाकरे आणिमुरलीधर जाधव यांच्या चर्चा होणार का? या आशयाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
आदित्य ठाकरेंची तोफ शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर धडाडणार : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही विद्यमान खासदारांना पाडू असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हे दोन्ही मतदारसंघ मजबूत करण्यासाठी आतापासूनच सुरुवात करण्यात आलीय. त्यामुळं सभेदरम्यान आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलय.
हेही वाचा -
- "हे सरकार महाराष्ट्रविरोधी, सत्तेवर येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
- खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळं राज्य उद्ध्वस्त, आदित्य ठाकरेचं जनतेला खुलं पत्र
- मागील 25 वर्षात तुम्ही फक्त मुंबईला लुटलं; शिवसेना नेत्यांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र