कोल्हापूर -महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Ekikaran Samiti) नेते दीपक दळवी (Deepak Dalvi) यांना काळे फासल्याची घटना घडली आहे. बेळगाव (Belagavi) येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात अज्ञाताने हे कृत्य केले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होत असताना एका व्यक्तीने हे कृत्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये समांतर असा एक मेळावा घेतला जातो. घडलेल्या घटनेनंतर उद्या (14 डिसेंबर) बेळगाव बंदची (Belagavi Bandh) हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींवर शाई फेक - अशा कृत्यामुळे चळवळ थांबणार नाही -
घडलेल्या या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे आमची चळवळ थांबणार नाही. याउलट मोठ्या जोमाने ही चळवळ पुढे जाईल असेही यावेळी एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी म्हंटले आहे. बेळगाव पोलिसांनी संबंधित शाई फेकलेल्या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आले आहेत. लोकशाहीच्या मार्गाने आजपर्यंत लढत आले आहेत. मात्र, वारंवार कन्नड सरकारकडून त्यांच्यावर अन्याय होत आला आहे. दरवर्षी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते. याच वेळी मराठी भाषिकसुद्धा 2006 वर्षापासून समांतर असा मेळावा घेत असतात. याच मेळाव्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. या संतापजनक घटनेचा सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. उद्या बेळगाव बंदचीसुद्धा हाक देण्यात आली आहे.