मुंबईमध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या संत सेना महाराज यांचा जन्म झाला. त्यांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. विठ्ठलभक्त सेना महाराज यांचे देवाशी असलेले नाते एका कथेतून समोर येते. तिथल्या राजाच्या घरी नाभिक म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांच्या घराकडे दिली गेली. एके दिवशी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असताना त्यांना राजाकडून बोलावणे आले.पूजा आटपून राजाकडे जावे असे त्यांनी ठरवले. मात्र, पूजेत ते खूप वेळ गर्क झाले. आणि राजाचे बोलावणे विसरले. त्या दरम्यान, सेना महाराज यांच्या पूजेत खंड पडू नये यासाठी स्वत: विठ्ठलाने राजाच्या घरी जाऊन नाभिकाचे काम केले ही कथा तेथे प्रचलित आहे. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.
भाषा, जातपात यांच्या मर्यादे पलिकडे अतिशय उच्च विचारसरणी व विठ्ठलावर संत सेना महाराज यांची निष्ठा होती. हरिभक्त संत सेना महाराज यांचा जन्म महाराष्ट्राबाहेर असला तरी महाराष्ट्रातील संताच्या सहवासात ते घडले. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत थोरामोठ्यांकडून गायले जातात. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते.