कोल्हापूर- मोस्ट वॉन्टेड रिव्हॉल्व्हर तस्कर मनीष नागोरीला शाहूपुरी पोलिसांनी कोल्हापूरच्या स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. मोस्ट वॉन्टेड नागोरीवर पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात २० रिव्हॉल्व्हर तस्करीचे आणि खुनाचे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात 'रिव्हॉल्व्हर' पुरवणारा आरोपी मनीष नागोरी पोलिसांच्या ताब्यात - shahupuri
मोस्ट वॉन्टेड नागोरीवर पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात २० रिव्हॉल्व्हर तस्करीचे आणि खुनाचे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मोस्ट वॉंटेड रिव्हॉल्व्हर तस्कर मनीष नागोरी हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी परिसरात राहणारा आहे. यापूर्वी त्याच्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रिव्हॉल्व्हर पुरावल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मनीष नागोरीला तडीपार केले होते.
आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना नागोरी हा हॉटेल स्कायलार्क इथे आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे यांच्या पथकाने हॉटेल स्कायलार्क धाड टाकून नागोरी याला ताब्यात घेतले. नागोरीवर मुंबई पोलीस कायदा कलम १४२ नुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आज दुपारी नागोरीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी नागोरीची चौकशी सुरू केली आहे. त्याच्याकडून आणखी रिव्हॉल्वर मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.