कोल्हापूर - राज्यातील सर्व घोषित, अघोषित शाळा व तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा शासन निर्णय तातडीने जारी करून विनाअनुदानित व टप्पा अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना २० टक्के व त्यापुढील देय टप्प्याप्रमाणे तत्काळ पगार सुरू व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 'कोल्हापूर, सांगली ते बारामती' अशा पायी दिंडी काढण्यात आली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अनुदानासाठी साकडे घालण्यासाठी ही दिंडी काढत आहोत, असे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. जगदाळे हे गेल्या 4 वर्षांपासून विनाअनुदानितच्या मागण्यांसाठी अनवाणी फिरत असून या दिंडीतही ते अनवाणी सहभागी झाले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले असून प्रचंड वेदना होत आहेत. तरीही मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आता माघार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.