कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे यंदा कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. सध्या राजाराम बंधारा पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली आहे. तर, इशारा पातळी गाठायला केवळ 8 फूट बाकी आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 21 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले
कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत सुद्धा झपाट्याने वाढ सुरू आहे. शिवाय काल (13 सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास राधानगरी धरणाच्या एकूण सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जवळपास 7 हजार क्यूसेकहुन अधिक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळीत अधिकच वाढ होत आहे. यंदा 2019 पेक्षाही मोठा महापूर जिल्ह्याने अनुभवला. आता लगेचच पुन्हा पंचगंगा इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाकडून वारंवार देण्यात येणाऱ्या सुचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
टीएमसी म्हणजे नक्की किती?
एक टीएमसी फूट म्हणजे १०० कोटी घनफूट (क्युबिक फूट). इंग्रजीमधील संख्याशास्त्राप्रमाणे मिलियन हा शब्द वापरतात. त्यामुळेच जास्त प्रमाणात पाणी असेल तर त्याला वन थाऊजंड मिलियन क्युबिक फूट असं म्हणतात. यावरुन टीएमसी हे एकक जन्माला आलं. लिटर्समध्ये सांगायचं झालं तर एक टीएमसी फूट म्हणजे २.८३१ x १०,०००,०००,००० लीटर पाणी. सोप्या भाषेत सांगायचं तर २८० हजार कोटी लिटरहून अधिक. उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातील खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी एवढी आहे म्हणजे या धरणामध्ये १.९७ गुणीले २.८३१ x १०,०००,०००,००० इतकं पाणी साठवू शकतो. एक घनफूट (क्युबिक फूट) पाणी म्हणजे २८.३२ लिटर होय.
क्युसेक म्हणजे काय?
हे पाण्याचा प्रवाह किती आहे हे मोजण्याचं एकक आहे. ‘क्युसेक्स’ म्हणजे ‘घनफूट प्रतिसेकंद’ तर ‘क्युमेक्स’ म्हणजे ‘घनमीटर प्रतिसेकंद’. एखाद्या धरणातून एका सेकंदाला किती घनफूट (क्युबिक फूट) किंवा घनमीटर पाणी वाहतं हे या एककाच्या मदतीने समजतं. म्हणजेच वर उल्लेख केला त्याप्रमाणे खडकवासला धरणातून गुरुवारी दुपारी १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला म्हणजे गुरुवारी दुपारपासून खडकवासला धरणामधून प्रती सेकंदाला १० हजार ९३ घनफूट (क्युबिक फूट) वेगाने पाणी सोडण्यात आलं. म्हणजेच १० हजार क्युसेक्स वेगाने १ टीएमसी पाणी सोडलं असं म्हटल्यास. एका सेकंदाला १० हजार घनफूट पाणी या हिशोबाने १०० कोटी घनफूट पाणी सोडलं.
महाराष्ट्रातील मोठी धरणे
- उजनी ११७.२७ टीएमसी
- कोयना १०५.२७ टीएमसी
- जायकवाडी ७६.६५ टीएमसी (पैठण)
- पैंच तोतलाडोह ३५.९० टीएमसी
- पूर्ण येलदरी २८.५६ टीएमसी