कोल्हापूर - कोरोनाच्या या महाभयंकर अशा संकटामुळे सर्वजण धास्तावले आहेत. कोल्हापुरात तर प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात 100 टक्के बंद पाळलेल्या गावांची नावेही आता हिटलिस्टवर आली आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44 वर पोहोचली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना सीपीआरमधून कोणत्याच पद्धतीची अधिकृत आणि सविस्तर माहिती पत्रकारांना तात्काळ मिळत नाहीये.
सीपीआर रुग्णालयाचा सावळा गोंधळ.. कोऱ्या कागदावर दिली जातेय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती, जिल्हा व्हेंटिलेटरवर - कोल्हापूर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबाबत अधिकृत माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून कोऱ्या कागदावर लिहून कोरोना बाधितांची माहिती प्रसिद्धीसाठी देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या या सावळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अफवांना पेव फुटले असून आरोग्य विभागाची बेफिकीरी यातून दिसत आहे.
सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या माहितीत सावळा गोंधळ असल्याने अख्खा जिल्हा व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालय प्रशासनाकडून कोऱ्या कागदावर रुग्णाची माहिती दिली जाते. एखाद्या गावात रुग्ण सापडला एवढी माहिती जरी एखाद्याला मिळाली तर ती वाऱ्याच्या वेगाने जिल्ह्यात पसरत आहे. त्यात जिल्ह्यात एकाच नावाची अनेक गावे असल्याने नेमके कोणत्या गावातील पेशंट आहे हे लवकर स्पष्ट होत नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागून राहतो. ही सगळी धाकधूक कमी व्हावी यासाठी पत्रकार अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करतात मात्र माहिती देणारी यंत्रणाच इतकी कुचकामी आहे की त्यांच्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी एकूण रुग्णांच्या संख्येचा तक्ता वगळला तर कोणत्याच पद्धतीची लेखी माहिती सीपीआर प्रशासनाकडून दिली जात नाहीये.
एखादा नवीन रुग्ण सापडला तर पत्रकारांनी विचारल्यानंतरच प्रशासनाकडून माहिती दिली जाते. अधिक माहिती घेण्यासाठी जबाबदार व्यक्तीला फोन केल्यानंतर थोड्या वेळात माहिती देतो असे उत्तर येते. काहीवेळा आमच्याकडे याबाबत माहिती उपलब्ध नाही, असेही सरळ सरळ सांगितले जाते. या सर्व प्रकारामुळे लोकांपर्यंत अचूक माहिती देणे कठीण बनले आहे. अर्धवट माहितीमुळे लोकांमध्ये तर गोंधळ निर्माण झालाच आहे. शिवाय माध्यमांमधून सुद्धा वेगवेगळी आकडेवारी येत आहे. नक्कीच सीपीआर प्रशासनावर सद्या मोठ्या प्रमाणात कामाचा ताण आहे. मात्र रुग्णांबाबत अधिकृत माहिती देणे ही सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने सुद्धा या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून पत्रकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत अचूक माहिती कशी पोहोचवता येईल, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.