कोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर हॉटेल आणि लग्न समारंभांना भाड्याने देण्याचा घाट हे सरकार घालत आहे. त्यामुळे शिवरायांचा इतिहास पुसला जाणार असून शिवरायांचे विचारच संपवण्याचे षडयंत्र शिवसेना-भाजप युतीचे सरकार करत असल्याचा थेट आरोप कोल्हापूर काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी येथे कार्यालयीन प्रवेश करून आपला पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर काँग्रेस हेही वाचा - कोल्हापूर-सांगली पूर प्रकरणी तत्काळ उपाययोजना कराव्यात - उच्च न्यायालयाचे आदेश
यावेळी सरकारवर निशाणा साधत त्यांनी मंदी आणि बेरोजगारीचे मोठे संकट देशावर आले असून आता त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत असल्याचे म्हंटले. शिवाय विकास करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्यापेक्षा आपापसात भांडण लावण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद त्यांना दाखवून देणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्ष संपलेला नाही. विरोधी पक्ष ताकदीने लढत आहे. भाजप सरकारने आमचे काही चुकले असेल तर कडेलोट करावा असे म्हटले होते. आता जनतेने त्यांचा कडेलोट केला पाहिजे, असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला.
हेही वाचा - राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार