कोल्हापूर -आयकर विभागाने मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील प्रमुख अर्थीक केंद्र समजल्या जाणाऱ्या गोकुळ दुध संघाच्या शिरगांव येथील कार्यालयावर धाड मारली. आयकराची रक्कम कमी वेळेत भरली गेली नसल्याने ही कारवाई केली गेली असल्याचे बोलले जात आहे. सुमारे ५ कोटी रुपयांची आयकराची रक्कम भरली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
गोकुळ दुध संघाच्या शिरगांव येथील कार्यालयावर धाड
पाच कोटी रुपयांची आयकराची रक्कम भरली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
शिरगांव येथील कार्यालयात ४ तास संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान हा नियमीत तपासणीचा भाग असल्याचे गोकुळच्या अधिकृत सुत्रांनी माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या चार जाणांच्या पथकाने ही चौकशी केली असल्याचे समोर आले आहे. गोकुळ दुध संघाला प्रतिमहिना एक ठराविक रक्कम आयकराच्या स्वरुपात भरावी लागते. एका महिन्यात ही रक्कम कमी-जास्त प्रमाणात भरली जाते. पण, गेल्या महिन्यात सुमारे ५ कोटी रुपये कमी भरल्याचे समोर आल्या कारणाने ही चौकशी केली असल्याचे बोलले जात आहे.
या चौकशी दरम्यान दुध संघातून विक्री केलेला माल, प्रत्यक्ष उत्पादन, माल कोणाला विकला, त्यातून किती नफा मिळाला यासंदर्भातील कागदपत्रे या पथकाने तपासली. यावेळी संघाच्या कार्यकारी संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चार्टर्ड अकाउटंटही उपस्थित होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत संघाच्या अस्थापना, अकाउटंट विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनाही थांबवून ठेवण्यात आले होते. सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर संघाने पाच कोटी रूपये प्राप्तीकर कमी भरल्याचे आढळून आल्याचे समजते. एवढी रक्कम भरावी अशी नोटीसही संघाला दिल्याचे वृत्त आहे.