कोल्हापूर -राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार आज सकाळपासून कोल्हापूरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, सकाळपासून कोल्हापूरात पावसाने झोडपून काढले आहे. शहरामध्ये सुद्धा गेल्या तासभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
आठ दिवसांपूर्वीच पंचगंगा नदी पडली होती पात्राबाहेर -
नेमक्या गणेशोत्सवात कोल्हापूरात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. राधानगरी धरणाचे सुद्धा 4 स्वयंचलित दरवाजे उघडले उघडले. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. नदी पात्राबाहेर पडून जवळपास 31 फुटांवर पाणीपातळी पोहोचली होती. मात्र, घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर पुन्हा पावसाने 4 दिवस उसंत घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता व्यक्त केल्यानुसार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पाऊस लांबला असून आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने कोकण, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश मागे; जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती