कोल्हापूर- शहरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हा महानगरपालिकेच्या महापौर माधवी गवंडी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा ढोलाच्या तालावर ठेका धरला.
पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक सुरू झाली. गणपती बाप्पा आता पाऊस घेऊन जा, असे आवाहन करणारा फुग्याचा बोर्ड सोडून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा ढोलाच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. मिरवणुकीत गणपतीच्या पूजेला पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, आमदार सतेज पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.