महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात स्थलांतर सुरू; चंदगडच्या कोवाड बाजारपेठेत पाणी घुसले, जनजीवन विस्कळीत - कोल्हापूरमध्ये नद्यांना पूर

जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चिखली गावातील नागरिकांनी जनावरांसह कुटुंबांचे स्थलांतर सुरू केले आहे.

Kolhapur rain  Kolhapur flood situation  Rainfall in Kolhapur  कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस  कोल्हापूरमध्ये नद्यांना पूर  कोल्हापूर पाऊस परिस्थिती
कोल्हापुरात स्थलांतर सुरू; चंदगडच्या कोवाड बाजारपेठेत पाणी घुसले, जनजीवन विस्कळीत

By

Published : Aug 5, 2020, 6:30 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे.

कोल्हापुरात स्थलांतर सुरू; चंदगडच्या कोवाड बाजारपेठेत पाणी घुसले, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चिखली गावातील नागरिकांनी जनावरांसह कुटुंबांचे स्थलांतर सुरू केले आहे. तर चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहून स्थलांतराची भूमिका घेतली आहे.

कोल्हापूर शहरातील रामानंद, शाहूपुरी कुंभार गल्ली भागात पाणी शिरल्याने नागरिक कौटुंबीक साहित्य, गणेशमूर्ती सुरक्षित स्थळी हलवत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

चंदगड तालुक्यातील ताम्रपणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोवाड व्यापारपेठत पाणी घुसले असून व्यापारी व ग्रामस्थांनी आतापासूनच स्थलांतराला सुरुवात केली आहे. तर गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी व घटप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून भडगाव पूल पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. यामुळे गडहिंग्लज- चंदगड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाची मुसळधार सुरूच असून मंगळवारी रात्रीपासून नदीच्या पाणी पातळीत तब्बल 14 फुटांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाहत असून कोणत्याही क्षणी ती ओलांडण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदीकाठच्या गावांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रथम जनावरांना सुरक्षित स्थळी हलवा, त्यानंतर कुटुंब स्थलांतर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

कोल्हापूर शहरालगत असणारा ऐतिहासिक कळंबा तलावदेखील एका रात्रीत तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तर इचलकरंजीतील जुना पूल पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. केर्ली ते ज्योतिबा डोंगर मार्गावरील रस्ता पुन्हा खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 90 बंधारे पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. गगनबावडा मार्गावरील लोघे पुलावर पाणी आल्याने कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

आजरा मार्गे कोल्हापूर ते गोव्याला जाणाऱ्या मार्गावर हिरण्यकेशी नदीचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details