कोल्हापूर- गाडीच्या खास नंबरच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापुरात लॉकडाऊन काळातही कोल्हापूरकरांनी आपल्या गाड्यांना आपल्या आवडीचा नंबर मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. एकीकडे लॉकडाऊन काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे आपण सर्वांनी पाहिलंय मात्र दुसरीकडे कोल्हापुरात असा सुद्धा वर्ग आहेत ज्यांनी आपल्या गाडीला विशेष नंबर मिळावा यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.
कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गाडीचे नंबर सगळ्यांपेक्षा हटके आणि फॅन्सी असावेत, याची एक स्टाईलच कोल्हापुरात सुरू झाली आहे. 40 ते 50 हजारांच्या गाडींना सुद्धा 10 ते 20 हजार रुपये खर्च करून आपल्या आवडीचा नंबर घेतल्याची उदाहरणे आहेत. कोरोनाच्या या काळात सुद्धा अनेकांनी आपल्या गाड्यांच्या नंबरवर लाखो रुपये खर्च केले आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाले होते. मात्र, दुसरीकडे कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन विभागाला मात्र गाड्यांच्या विशेष नंबरवरून लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे. एप्रिल महिन्यापासून आज सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत विशेष नंबरसाठी तब्बल 1 कोटी 40 लाख इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांनी पैसे खर्च केले आहेत. यामध्ये 5 हजारांपासून अडीच लाखांपर्यंत नंबरवर पैसे खर्च केल्याची उदाहरणे आहेत. यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात काहीच नोंदणी झाली नव्हती. मात्र, जुलैपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि सप्टेंबरमध्ये सर्वाधिक वाहन नोंदणी झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस यांनी म्हटले आहे.
★ कशा पद्धतीने नागरिकांनी आपल्या गाडीच्या खास नंबरवर खर्च केले आहेत यावर एक नजर :
5 हजारांपर्यंत -
एकूण 1 हजार 181 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 50 लाख 54 हजार इतका महसूल मिळाला आहे.
5 हजार 1 ते 7 हजार 500 रुपयांपर्यंत -
एकूण 122 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 9 लाख 50 हजार इतका महसूल मिळाला आहे.
7 हजार 501 ते 10 हजार रुपयांपर्यंत -
एकूण 27 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 2 लाख 70 हजार इतका महसूल मिळाला आहे.
10 हजार 1 ते 20 हजारांपर्यंत -
एकूण 43 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 6 लाख 60 हजार इतका महसूल मिळाला आहे.
20 हजार 1 ते 50 हजारांपर्यंत -
एकूण 240 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 62 लाख 85 हजार इतका महसूल मिळाला आहे.
50 हजार 1 ते 1 लाखांपर्यंत -
एकूण 4 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 2 लाख 80 हजार इतका महसूल मिळाला आहे.
1 लाखांपासून अडीच लाखांपर्यंत -
एकूण 3 जणांनी विशेष नंबर घेतले आहेत. त्यातून तब्बल 4 लाख 50 हजार इतका महसूल मिळाला आहे.
एकूण विशेष नंबर गेलेल्या नागरिकांची संख्या 1 हजार 620 इतकी असून त्याद्वारे प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल 1 कोटी 39 लाख 14 हजार इतका महसूल मिळाला आहे.