महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनमुळे गेली नोकरी; नवा व्यवसाय सुरू करून बेरोजगार इंजिनिअर झाला आत्मनिर्भर - prasann shirgaonkar cafe

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोल्हापुरातील इंजिनिअर तरुण बेरोजगार झाला. मात्र, थोड्याच दिवसात त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. आता तो या व्यवसायातून नोकरीतून मिळणाऱ्या पगारापेक्षाही जास्त कमवू लागला आहे.

the unicorn cafe kolhapur
बेरोजगार इंजिनिअर झाला आत्मनिर्भर

By

Published : Sep 23, 2020, 8:03 AM IST


कोल्हापूर - कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू लागल्याने मार्च महिन्यात देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात उद्योगधंद्याना टाळे लागले आणि अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्या फटक्यात कोल्हापुरातील एका इंजिनिअरची सुद्धा नोकरी गेली. बेरोजगार झालेल्या या तरुणापुढे नोकरी गेल्याचे संकट होते. मात्र, या पुढे करायचे काय म्हणून तो हताश होऊन बसला नाही. तर त्याने स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि उभे केले द युनिकॉर्न कॅफे... या व्यावसायाच्या माध्यमातून त्याने आता बेरोजगारीवर मात केली आहे. प्रसन्न शिरदवाडे असे या युवकाचे नाव असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन धैर्याने लढल्यास कोणतीही गोष्ट अश्यक नसल्याचा संदेश तरुणाईला दिला आहे.. त्याच्या या अल्पवधीत नावारुपाला आलेल्या व्यवसायावर केलेला हा खास रिपोर्ट...

बेरोजगार इंजिनिअर झाला आत्मनिर्भर
प्रसन्न शिरदवाडे याने गेल्या वर्षी म्हणजेच 2019 साली 'इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन' या विभागातून इंजिनिअरिंग पूर्ण केली. डिग्री नंतर लगेचच त्याला एका खासगी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली. गेल्या एका वर्षांपासून तो त्या कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र देशात कोरोनाने इन्ट्री केली आणि संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. 3 महिन्यात सर्वकाही ठप्प झालं. देशातील अनेकांचे व्यवसाय बंद पडले तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. या काळात प्रसन्नला सुद्धा आपली नोकरी गमवावी लागली. त्याच्यासोबत त्याच्या काही सहकाऱ्यांना सुद्धा कंपनीने थोडे दिवस थांबण्यास सांगितले. दुसरी नोकरी शोधावी तर ती सुद्धा मिळणं कठीण झालं होतं, कारण कोणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला सुद्धा परवानगी नव्हती. मग काय करायचं असा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. शेवटी त्याच्या भावाचाच सुरू असलेला व्यवसाय आपण सुद्धा सुरू करायचा निर्णय घेऊन त्याने 'द युनिकॉर्न' नावाच्या फास्ट फूड कॅफेची सुरुवात केली. गेल्या 3 महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू असून त्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचे उत्पन्न सुरू आहे. ● कॅफे सुरू करायचं होतं तर इंजिनियरिंग का केलंहा कॅफे सुरू केल्यानंतर इंजिनियरिंग केलेल्या प्रसन्नला आजूबाजूचे तसेच अनेक मित्रांचे मॅसेज यायचे, की जर तुला कॅफेच सुरू करायचं होतं तर इंजिनियरिंग का केले? तु हॉटेल मॅनेजमेंट करायला हवं होतास.. मात्र ज्यामुळे हे संकट आले त्याला तोंड तर द्यावे लागणार होते. शिवाय शिक्षण कोणत्याही विभागातील असो आपण एखादा व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये जर मानापासून काम केलं तर नक्कीच चांगल्या पगाराच्या नोकरीप्रमाणेच त्यामध्ये कमवायला सुरुवात करतो, असेही प्रसन्न शिरदवाडे याने म्हंटलं आहे. ● सोशल मीडियाचा आधार मार्केटिंग साठी...लॉकडाऊनमुळे मे महिन्याच्या शेवटी हॉटेल मधून पार्सल द्यायला सुरुवात झाली. हीच संधी साधत प्रसन्न आणि त्याच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नवीन कॅफेचे मार्केटिंग केलं. शिवाय ऑर्डरची घरपोच सुविधा सुद्धा सुरू केली. त्यामुळे या व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला सोशल मीडियाचा सुद्धा मोठा फायदा झाल्याचे तो म्हणतो. ● नोकरी गेली म्हणून निराश होऊ नका; व्यवसायात संधी शोधा...माझ्याप्रमाणेच सगळीकडे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र त्यांनी कुठल्याही गोष्टीचा तणाव न घेता, निराश न होता आपणही एखादा व्यवसाय सुरू करून त्यामध्ये आनंदी राहा, असाही संदेश प्रसन्न याने तरुणाईला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details