प्रतिक्रिया देताना दीपक वावरे कोल्हापूर Widow Women Story : नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याची परंपरागत प्रथा आहे. ही प्रथा मोडीत काढत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शिधापत्रिका (रेशन कार्ड) अधिकारी दीपक वावरे (Dipak Wavare) यांनी विधवा महिलांच्या हातून गृहप्रवेशाचा विधी (Griha Pravesh) करून, कोल्हापूरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे. पाच वर्षांपूर्वी विधवा आईचं निधन झालं, आई हयात असती तर तिलाही या समारंभात सहभागी होता आलं नसतं, त्यामुळं विधवांना सन्मान देण्याचा धाडसी निर्णय वावरे कुटुंबीयांनी घेतल्यानं त्यांच्या या निर्णयाचं कोल्हापुरात कौतुक होत आहे.
विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव : समाजात कोणताही सण समारंभ असेल तर विधवा महिलांना एका कोपऱ्यात स्थान दिलं जातं. हळदी-कुंकू, मान-सन्मान यापासून या महिला दूरच असतात. मात्र काळानुरूप समाजात असलेल्या जुन्या रूढी परंपरांचा पगडा कमी होतानाचं सकारात्मक चित्र कोल्हापुरात दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव करून रूढी परंपरांना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सात सुवासिनींचे पूजन करून त्यांना जेवण वाढल्यानंतरच नव्या वास्तूत पंगत पडते, ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू आहे. याला फाटा देत कसबा बावडा येथील वावरे कुटुंबीयांनी गृहप्रवेश करताना सुहासिनी ऐवजी विधवा महिलांना मानसन्मान देऊन त्यांचं पूजन केलं आहे.
सुहासिनी ऐवजी विधवा महिलांना सन्मान: कसबा बावडा येथील धनगर गल्लीत राहणाऱ्या दीपक वावरे यांची आई उमा वावरे यांचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं. यानंतर आईच्या स्वप्नातील घर साकारलेल्या दीपक वावरे यांनी नव्या घराचा गृहप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुवासिनी पूजन करुन पंगत बसण्याची प्रथा आहे, अशी माहिती त्यांना नातेवाईकांकडून मिळाली. मात्र माझी आई जिवंत असतील तर तिलाही यापासून दूरच राहावं लागलं असतं. असा विचार दीपक यांच्या मनात आला आणि त्यांनी सुहासिनी ऐवजी विधवा महिलांना सन्मान देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी पाठबळ दिलं.
विधवा महिलांच्या डोळ्यात अश्रू : ज्यांच्यासोबत सातजन्म राहण्याची स्वप्नं बघितली होती त्यांचीच साथ सुटल्याने, या दुःखातून सावरताना अनेक अडचणींना विधवा महिलांना सामोरं जावं लागतं. त्यात घर आणि मुलाबाळांची जबाबदारी झेलत या महिला येणारा दिवस जगत असतात. मात्र समाजही या महिलांना मानसन्मान देण्यात कुठेतरी कमी पडतो अशी खंत प्रत्येक विधवा महिलेला वाटते. मात्र वावरे कुटुंबीयांनी गृहप्रवेशाच्या वेळी दिलेल्या सन्मानामुळं उपस्थित असलेल्या अनेक विधवा महिलांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा -
- VIRAL VIDEO : सांगलीच्या महापुरात नववधूने बोटीतून केला गृहप्रवेश
- गरजूंना धान्याची किट देवून परभणीच्या 'या' नवदाम्पत्याने केला गृहप्रवेश
- Video: "वरात निघाली महापुरात" वधू-वराचा पुराच्या पाण्यात बोटीतून गृहप्रवेश