महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापुरात लसीकरणासाठी लागलेल्या रांगांमुळेच कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

By

Published : Apr 22, 2021, 8:23 PM IST

नागरिकांनी लसीकरणाला येण्यापूर्वी एकदा खात्री करून घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 122 केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. प्रत्येक केंद्राला उपलब्धतेनुसार ठराविक डोस दिले जात आहेत. त्यामुळे संबंधित केंद्रावरील मेडिकल ऑफिसर यांच्याकडे चौकशी करूनच लस घ्यायला यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी केले आहे.

Crowd for vaccination in Kolhapur
Crowd for vaccination in Kolhapur

कोल्हापूर - जिल्ह्यात एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र दुसरीकडे लसीचा तुटवडा भासत असल्याने अनेकांना परत जावे लागत आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. परिणामी काही ठिकाणी नागरिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शहरातील राजारामपुरी परिसरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 3 याठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी लसीकरणासाठी मोठी रांग लावली होती. एकीकडे कोरोनापासून संरक्षण मिळावे यासाठी लस घ्यावी लागत आहे, मात्र लसीकरणासाठी होत असलेली गर्दी पाहून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.

लसीकरणासाठी झालेली गर्दी

लसीकरणात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 7 लाख 30 हजार जणांचे लसीकरण झाले आहे. कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात आघाडीवर आहे. सद्या जिल्ह्यातील 122 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. काल (बुधवारी) सुद्धा जिल्ह्याला 74 हजार डोस प्राप्त झाले होते. दिवसभरात त्यातील 35 हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असून आज (गुरुवारी) 30 हजार व्यक्तींचे लसीकरण होईल, अशी शक्यता आहे. जिल्ह्यात एका आठवड्यात जवळपास 2 लाख 80 हजार डोसची गरज आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे शासनाने जिल्ह्याला पुढच्या आठवड्यात जास्तीत जास्त डोसचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांनी गर्दी करू नये

दरम्यान, नागरिकांनी लसीकरणाला येण्यापूर्वी एकदा खात्री करून घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 122 केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. प्रत्येक केंद्राला उपलब्धतेनुसार ठराविक डोस दिले जात आहेत. त्यामुळे संबंधित केंद्रावरील मेडिकल ऑफिसर यांच्याकडे चौकशी करूनच लस घ्यायला यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details