कोल्हापूर Virat Kohli Cutout in Kolhapur : मायदेशात होत असलेल्या यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं सलग तीन सामने जिंकत विजयाची हॅटट्रिक केलीय. यानंतर आज भारत विरुद्ध बांगलादेश सामना होत असल्यानं क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलाच उत्साह पहायला मिळतोय. फुटबॉलची पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात क्रिकेटचा फिव्हर चढल्याचं चित्र पाहायला मिळतय. कारण कोल्हापुरातील निवृत्ती चौकात विराट कोहलीच्या चाहत्यांनी पंधरा फुटांचा कटआउट उभारून भारतीय संघानं सलग चौथा विजय साकारावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आयसीसी विश्वचषक उंचावण्यची आशा : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघानं विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाला पराभूत करत स्पर्धेत आपलं तगडं आव्हान निर्माण केलंय. अफलातून फॉर्म मध्ये असणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि तडाखेबंद फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांची देशभरात कमी नाही. त्यातच विराट कोहलीच्या फलंदाजीचे चाहते असलेल्या कोल्हापुरातील क्रिकेट शौकिनांनी राणा दा स्पोर्ट्स गांधी मैदान यांच्यावतीनं भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी निवृत्ती चौकात 15 फूट कट आउट उभा केलाय. आजचा बांगलादेश विरुद्धचा सामना भारत जिंकेलंच मात्र भारतीय संघच यंदाचा आयसीसी विश्वचषक उंचावेल अशाही भावना यावेळी क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.