कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय तिसऱ्या लाटेची सुद्धा भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुद्धा सर्वांनाच सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील पहिले लहान मुलांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमधील सर्वच भिंतींवर विविध कार्टूनचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
कोल्हापुरातील माणगावमध्ये उभारले लहान मुलांचे पहिले कोविड सेंटर
कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील पहिले लहान मुलांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमधील सर्वच भिंतींवर विविध कार्टूनचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
कोरोनाला थोपवण्यासाठी माणगाव ग्रामपंचायतीने आजपर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये आपली सुरक्षा आपल्या हातात आहे हे लोकांना समजावून सांगणारी 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच माणगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केली आहे. एव्हढेच नाही तर गावात कडक लॉकडाऊन करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरफळ्याच्या 20 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जात आहे. अनेकांवर आजपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सरपंच राजू मगदूम यांच्या संकल्पनेमधून या पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नुकतीच याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा घेतली होती. आतातर गावात लहान मुलांचे कोविड सेंटर सुरू केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
आतापर्यंत 4 हजार 842 लहान मुलांना कोरोनाची लागण
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 25 हजार 274 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 8 हजार 508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3 हजार 998 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 12 हजार 768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी 4 हजार 842 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 1 वर्षांखालील मुलांची संख्या 223 इतकी आहे.
हेही वाचा -Weather Forecast : मुंबईत रेड अलर्ट, येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता