कोल्हापूर - ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, त्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांनी पुढाकार घेत आपल्या आनंदावर, उत्साहावर पाणी सोडत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील तब्बल 97 गावांमध्ये गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे, तर 303 गावांनी 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याची संख्या आणखी वाढणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले.
कोरोना इफेक्ट : यंदा 97 गावात गणेशोत्सव नाही; तर 303 गावात 'एक गाव एक गणपती'
ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, त्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांनी पुढाकार घेत आपल्या आनंदावर, उत्साहावर पाणी सोडत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातच पूरस्थितीचे सावट आहे. गणेशोत्सवात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण असणार आहे. अशावेळी सार्वजनिक तरुण मंडळांनी व गावांनी यंदाचा गणेशोत्सव राज्य शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्ती नुसार साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 97 गावांनी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर पोलिसांच्या आवाहनानुसार 303 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक उपक्रमावर भर
कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात होणारी, सजावट, वाद्य, महाप्रसाद इतर खर्चाला फाटा देऊन प्लाझ्मा दान, बेड्स, रक्तपुरवठा, सॅनिटायझर, धान्यवाटप यासारखे उपक्रम राबवणार असल्याचे मंडळांनी जाहीर केले आहे.
सार्वजनिक तरुण मंडळावर दबाव नाही
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पोलीस प्रशासन सार्वजनिक तरुण मंडळावर कोणताही दबाव आणत नाही. मात्र सामाजिक भान राखून राज्य शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले आहे.