सतेज पाटील मविआच्या फॉर्म्युल्याविषयी बोलताना कोल्हापूर : तिन्ही पक्ष सध्या लोकसभेच्या संपूर्ण 48 जागांची चाचपणी करत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचा लोकसभेच्या 48 जागांसाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'फॉर्म्युला' ठरणार आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात आमच्यात कुठलाही वाद राहणार नाही. महाविकास अघाडीचे 40 खासदार कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असे काँगेस नेते आमदार सतेज पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या स्वागताची तयारी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या 25 तारखेला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शिवाय शरद पवार यांची दसरा चौकात जाहीर सभा देखील पार पडणार आहे. शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी महाविकास आघाडीकडून सुरू आहे. शरद पवार हे 25 ऑगस्टला कोल्हापुरात आल्यावर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उत्साहात स्वागत करणार आहोत. कोल्हापुरकरांचे नेहमीच त्यांच्यावर प्रेम राहिले आहे, असे म्हणत लोकसभेची तयारी आम्ही तीनही पक्ष करत आहोत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरेल, असे सतेज पाटील म्हणाले.
'या' दोन जागांबद्दलही चर्चा सुरू : सध्या तिन्ही पक्ष संपूर्ण 48 जागांची चाचपणी करत असून, यावर वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. कोल्हापूर आणि हातकणंगले जागेबाबत देखील चर्चा सुरू आहे. वरिष्ठ जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही काम करू. कोल्हापुरात पुरोगामी विचारांचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची इच्छा काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाराजांबद्दल आम्हाला आदरच आहे, असे देखील सतेज पाटील म्हणाले.
राज्यात संभ्रमाची परिस्थिती : राज्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम प्रशासनावर होत आहे. लोकांची कामे होतं नाहीत. केलेल्या विकास कामाचे पैसे मिळत नाही. राज्यात नेमकी सत्ता कोणाची आहे आणि सत्ता कोणी चालवायची हा वाद निर्माण झाला आहे. पूर्वी ते आमच्यावर टीका करत होते. तीन पक्ष एकत्र आले असून आता तीच परिस्थिती त्यांची आहे. किमान आमच्या वेळेस उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकदिलाने काम करायचे. मात्र, आता त्यांच्यात मतभेत झाल्याने याचा थेट परिणाम विकासावर होत आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी सरकारवर केली आहे.
'इनडोअर स्टेडियम'च्या कामाला स्थगिती : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक कामांना स्थगिती देण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयातून आम्ही कामांची मंजुरी आणून कामांना सुरुवात केली. कोल्हापुरात तब्बल 10 कोटी रुपयांचे पहिले इनडोअर स्टेडियम होत आहे; मात्र याला स्थगिती आणण्याचं पाप खासदार धनंजय महाडिक यांनी केलं असल्याची माहिती समोर आल्याचे सतेज पाटील म्हणाले. तसेच याचा निधी दुसरीकडे वळवला असल्याचीही माहिती मिळाली असून याचा धनंजय महाडिक यांनी खुलासा करावा, असे पाटील म्हणाले आहेत. सत्ता तुमची आहे. खिरापत वाटत आहात तर वाटा. मात्र, इनडोअर स्टेडियमचा निधी दुसरीकडे वळवणे हे चुकीचं असून हा खेळाडूंवर अन्याय आहे असे सतेज पाटील म्हणाले आहेत. शिवाय कोल्हापूरला गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून आयुक्त मिळत नाही. यावरूनच शासन किती गतिमान आहे याचीही प्रचिती येते, असा टोलाही सतेज पाटील यांनी सरकारला लगावला आहे.
हेही वाचा:
- Dhananjay Munde : शरद पवार आमचे पांडुरंग, शेवटच्या श्वासापर्यंत...; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण
- CWC : कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाची वर्णी?
- Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं खुशाल कोर्टात जा, मी वकील देतो; संजय राऊतांचा टोला