कोल्हापूर - केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. 13 जुलै) निदर्शने करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. शिवाय जोपर्यंत देशातील महागाई कमी होत नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन सुरूच राहील, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले. दरम्यान, या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि आंदोलाकडे लक्ष वेधण्यासाठी वासुदेव आणि टांगाही आणण्यात आले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली.
महागाईचा भस्मासूर; जोपर्यंत सर्वसामान्यांना दिलासा नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही
यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, जेव्हापासून देशात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून सातत्याने महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार झाले आहेत. घरगुती गॅस तसेच खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचीही प्रचंड महागाई वाढली आहे. या महागाईमुळे जनतेचे जगणेही मुश्कील झाले आहे. सातत्याने वाढत असलेल्या या किंमतीमुळे आता देशातील जनता गप्प बसणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा. महागाई कमी होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असेही ऋतुराज पाटील यांनी यावेळी म्हटले.