कोल्हापूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा व्हायच्या आधी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून अनेकांना धक्का दिला आहे. खरेतर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी देऊन उरलेल्या चार ठिकाणी भाजप आपल्या उमेदवारांच्या जागेवर दावा दाखवणार होते. मात्र, भाजप-सेनेमध्ये कोल्हापूरबाबत नेमका कोणता फॉर्म्युला ठरला आहे, हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोल्हापूर सोडून राज्यात भाजप-सेनेची युती झाली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ वगळता इतर कोणत्या ठिकाणी भाजप आपले दोन उमेदवार देणार याबाबत चित्र स्पष्ट झाले नव्हते. मात्र, कागल आणि चंदगड या दोन मतदारसंघांमध्ये भाजपच्या ज्या इच्छुक उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली होती, त्यांचा मात्र हिरमोड झाल्याचे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर सोडून भाजप-सेनेची युती आहे का? अशी चर्चा आता कोल्हापुरात रंगली आहे. जरी या आठ जणांना शिवसेनेकडून एबी फॉर्म दिले असले तरी कागल आणि चंदगड मतदारसंघांतील या इच्छुक उमेदवारांवर अजूनही टांगती तलवार असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे.
कोल्हापूर जिल्हा खरेतर काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे दोन खासदार आणि सहा आमदार आहेत. त्यामुळे हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा असल्याचे मानले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या घोषणेच्या आधीच अचानकपणे कोल्हापुरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सहा विद्यमान आमदार आणि दोन इच्छुक उमेदवारांना एबीफॉर्म देऊन राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला वाट करून दिली आहे. गेल्या वर्षभरापासून कागल विधानसभा मतदारसंघामध्ये म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. समरजितसिंह घाटगे यांनी युतीचा उमेदवार मीच असेल, असा विश्वास ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला होता.
युतीचा उमेदवार मीच असेल असा विश्वास जरी समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला असला तरी गतवेळेचे पराभुत झालेले माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सुद्धा आपण स्वतः या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, कोणत्या परिस्थितीत मी कागल विधानसभा लढवणार असल्याचे मत व्यक्त केले होते. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एबी फॉर्म देऊन माझी उमेदवारीच जाहीर केली आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे मला मदत करतील आणि त्यांच्याकडे मी स्वतः मला मदत करण्याबाबत विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हीच परिस्थिती चंदगड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. याठिकाणी संग्राम कुपेकर यांना उद्धव ठाकरे यांनी सेनेकडून एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे भाजपच्या जागेचे काय असा प्रश्न अनेक जनांसमोर पडला आहे. याठिकाणी शिवाजी पाटील यांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी सुरू करा, असे सांगितले असल्याचे स्वतः शिवाजी पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं होते.