कोल्हापूर :गोव्याच्या दिशेने शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर आज पहाटेच्या सुमारास पुईखडीच्या घाटात उलटल्याची घटना घडली. कंटेनर उलटल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी अक्षरशः कंटेनर लुटून नेल्याचे पाहायला मिळाले. दुचाकीसह चारचाकी वाहनधारकांनी सुद्धा गाड्या थांबवून शीतपेय बॉटल उचलल्या. ही घटना करवीर तालुक्यातील पिराचीवाडी परिसरात घडली.
तासाभरात कंटेनर केला रिकामा : आज पहाटेच्या सुमारास कोल्हापूरातून गोव्याकडे जाणारा शीतपेयाचा कंटेनर अचानक पालटी झाला. अंधार असल्याने पहाटे कोणी जास्त लक्ष दिले नाही. मात्र सकाळ होताच एक एक करत अनेकांनी कंटेनरमधील शीतपेय बॉटल पळवायला सुरुवात केली. यामध्ये दुचाकी चालकांसह चारचाकी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. बघता बघता तासाभरात संपूर्ण कंटेनर नागरिकांनी रिकामा केला. या घटनेची नोंद कोल्हापूरातील करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीवर थरावर थर लावून बॉटल पळवल्या : आज सकाळी शेतकऱ्यांची आणि नागरिकांची गाडीतील बाटल्या नेण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. काही दुचाकीचालकांनी तर आपल्या गाडीवर एकावर एक थर लावून नेता येत नव्हते तरीही बॉटल पळवल्या. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरतात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती.