कोल्हापूर - कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी अजूनही संथगतीनेच इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. गेल्या बारा तासांपासून केवळ पाच ते सहा इंच इतकच पाणी वाढले असून सद्यस्थितीत पंचगंगा नदीची पाणी पातळी 37.2 फुटांवर पोहोचली आहे. याच वेगाने जर पाणीपातळी वाढत राहिली तर 39 फूट जी इशारा पातळी आहे, ती गाठण्यासाठी अजूनही 15 ते 20 तास लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ( Panchganga warning level is likely to be reached ) शिवाय मागील दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा सुद्धा जोर किंचित कमी आला असून महापुराचे मोठे संकट जिल्ह्यावर येणार नाही अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, खबरदारी म्हणून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली - जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला असला तरी अजूनही जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय कासारी मध्यम प्रकल्प, गेळवडे येथील धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यात तसेच विद्युतविमोचकातून कासारी नदीमध्ये विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
9 जुलैपर्यंत जोरदार पाऊस -भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात याच पद्धतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य:स्थितीत इशारा पातळीपर्यंत उद्या 8 जुलै पहाटेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आज आणि उद्या होणाऱ्या पावसावरच कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण होईल की नाही किंवा पंचगंगा धोका पातळीपर्यंत पोहोचेल का हे समजू शकणार आहे.