कोल्हापूर - सुरुवातीच्या काळात पर्याय नव्हता, म्हणून नेते पक्षांतर करत नव्हते. मात्र, आता पर्याय उपलब्ध झाल्याने लोक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही झाल्यामुळेच लोक आता पक्षांतर करत असल्याचेही पाटील म्हणाले. महाराष्ट्र वर्षानुवर्षे दोन अडीचशे घराण्यांनी चालवला असे म्हणत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
पर्याय उपलब्ध झाल्यानेच अनेकांचे भाजपमध्ये पक्षांतर - चंद्रकांत पाटील - चंदगडचे माजी आमदार
सुरुवातीच्या काळात पर्याय नव्हता, म्हणून नेते पक्षांतर करत नव्हते. मात्र, आता पर्याय उपलब्ध झाल्याने लोक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोल्हापूरमधील चंदगडचे माजी आमदार भरमू पाटील यांनी आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आपली माणसे आपल्याला जपता येत नाहीत आणि दुसऱ्याला दोष द्यायचा, हे चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. भाजपने पक्षांतरासाठी कोणावरही दबाव आणला नसल्याचेही पाटील म्हणाले.
तुम्ही महाराष्ट्र लुटलाय, त्यामुळे तुमचा सगळा हिशोब करणार असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. भाजपने कोणलाही ईडी किंवा इन्कम टॅक्सची भीती दाखवली नाही. आपली माणसं आपल्याला जपता येत नाहीत आणि त्याचा दोष भाजपला देत असल्याचे म्हणत पाटील यांनी शरद पवार यानांही लक्ष्य केले.