कोल्हापूर - गेल्या ६० दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी डबल पीपीई किट घालून घराबाहेर पडायला पाहिजे. दिवसातून ६ वेळा पीपीई किट बदलली तरी चालेल. राजा फिरतो त्यावेळी प्रजा ठिकाणावर असते. मात्र, राज्यात असे काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे हे सरकार कोरोनाची स्थिती हाताळायला पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज जवळपास दोन महिन्यानंतर ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
'डबल पीपीई किट घाला, दिवसातून सहावेळा बदला; पण मातोश्रीतून बाहेर पडा' - चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका
चंद्रकांत पाटील हे जवळपास दोन महिन्यानंतर आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळायला अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 22 मे रोजी भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच टीका केली होती. दादा कोल्हापुरातील नागरिक मेले की जिवंत आहेत, हे पाहायला सुद्धा आले नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मुश्रीफ यांनी हा प्रश्न त्यांच्या नेत्याला विचारायला हवा. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी मातोश्री सोडले नाही. शिवाय मुश्रीफ ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात असायला हवे होते. मात्र, ते इथं काय करत आहेत? असा सवाल सुद्धा चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.