कोल्हापूर - गेल्या चार महिन्यापासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शन घेण्यासाठी बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर परिणाम जाणवत आहे. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना आर्थिक फटका बसला आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात भाविकांसाठी श्री. अंबाबाई मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी कोल्हापुरातील पुजाऱ्यांनी केली आहे.
अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले करावे - श्री पूजकांची मागणी
अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात भाविकांसाठी श्री. अंबाबाई मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी कोल्हापुरातील पुजाऱ्यांनी केली आहे.
मंदिरावर अवलंबून असणारे जवळपास ५०० हून अधिक लहान मोठे व्यवसाय आहेत. हार, ओटी साहित्य, नारळ विक्रेते, फुल विक्रेते, प्रसाद यांसारखे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांचा रोजचा उदरनिर्वाह त्याचा व्यवसायावर चालतो. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून त्याला आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीचा विचार करून अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत, अशी मागणी कोल्हापुरातील श्री पूजक मंडळाच्या वतीने मकरंद मुनींश्वर यांनी केली आहे.