कोल्हापूर -राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कृपादृष्टीमुळे पाणीदार आणि सदन जिल्हा म्हणून कोल्हापूरची राज्यभरात एक वेगळी ओळख आहे. राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. इथल्या नागरिकांना पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठीसुद्धा कधी पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागले नाही. एका वर्षात चार चार पिकं घेऊन इथला शेतकरी सधन झाला. पण चुकीच्या पद्धतीने पाण्याचा अतिवापर शेतीच्या मुळावर उठला. जमीन नापिक बनली. पण यावर देखील मात करत इथले शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने शेती करू लागले आहेत. पाहुयात याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
एखाद्या वाळवंटासारखी दिसणारी ही जमीन वसई विरारमधली नाही तर सुपीक समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. कोल्हापूरच्या पूर्वेला असणाऱ्या शिरोळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी. पण 12 महिने वाहणाऱ्या नद्यांमुळे इथं शेतीला वारेमाप पाणी देण्यात येत. तर वर्षात चार-चार पिकं घेऊन शेतकऱ्यांनी ही जमीन नापिक बनवली. शेती अगदी एखाद्या वाळवंटासारखी झाली. ज्या ठिकाणी आता काही उगवेल अशी शक्यता सुद्धा नव्हती त्या जमिनीला पुन्हा सुपीक बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दत्त सहकारी साखर कारखान्याच्या गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पूर्णपणे खचून गेलेल्या या शेतकत्यांना सा. रे. पाटील बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजदरात कर्जपुरवठा करण्यात आला. ही जमीन सुपीक बनवण्याचा नवीन प्रयोग सुरू केला. शेतीमध्ये हा नवीन प्रयोग यशस्वी होईल की नाही याची खात्री नसतानाही बँकेने आणि गणपतराव पाटील यांनी जवळपास 14 कोटींचा कर्जपुरवठा केला आणि कामाला सुरुवात झाली. क्षारपड बनलेल्या शेतीमध्ये सच्छिद्र पाईप प्राणालीच्या माध्यमातून पाणी चेंम्बरमध्ये साठवलं जाते आणि तेच पाणी पुन्हा नदीमध्ये सोडलं जातं.